रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

संगमेश्वर दि. ४ : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते साटलेवाडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या शिवधनातून उभारलेल्या रामेश्वर पंचायतन मंदिरात ८ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा भक्तगणांनी लाभ घ्यावा असे आवाहन साटलेवाडी समाजसेवा मंडळ मुंबई आणि समस्त साटले वाडी ग्रामस्थ मंडळाने केले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त ६ आणि ७ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता रामेश्वर चषक भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच ८ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आरोग्य शिबिरात महिलांचे विविध आजार, अस्थिरोग , मोतीबिंदू , मधुमेह, रक्तदाब, ई. सी.जी., तोंड आणि दातांची तपासणी केली जाणार आहे. परिसरातील गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

महाशिवरात्री निमित्त रामेश्वर पंचायतन मंदिरात सकाळी सात ते दहा महापूजा व अभिषेक, दहा ते एक सामुदायिक अभिषेक व महाआरती, दुपारी एक ते दोन महाप्रसाद, सायंकाळी तीन ते पाच हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी सहा ते रात्री आठ पालखी मिरवणूक, नऊ वाजता भजन, रात्री दहा वाजता कबड्डी स्पर्धेतील अंतिम फेरीतील सामने होणार आहेत. रामेश्वर पंचायतन हे संगमेश्वर तालुक्यातील एक पुरातन आणि प्रसिद्ध मंदिर आहे.

या मंदिरातील शिवलिंग, भव्य अलंकृत नंदी, अष्टदुर्गा, उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती, विष्णू, सूर्यदेवता या सर्वच मूर्ती रेखीव आहेत . विविध ठिकाणचे पर्यटक या मंदिराला भेट देण्यासाठी आवर्जून येत असतात. साटले वाडी ग्रामस्थांनी मुंबई मंडळाच्या सहकार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार करून एक आदर्श उभा केला आहे. परिसरातील अन्य मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या वतीने सुरू आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE