रोह्यातून विस्तारित केलेल्या चिपळूण मेमू ट्रेनच्या १५ मार्चपासूनच्या सर्व फेऱ्या रद्द!

रद्द केलेल्या ठिकाणी पर्यायी गाडीची प्रवाशांना प्रतीक्षा

रत्नागिरी : दिवा ते रोहा या मार्गावर नियमितपणे धावणाऱ्या मेमू लोकलच्या चिपळूणपर्यंतच्या दि. १५ ते ३० मार्च २०२४ पर्यंतच्या सर्व विस्तारित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून केवळ गर्दीच्या हंगामात दिवा- रोहा मेमू चिपळूणपर्यंत विस्तारित केली जात असल्याने रेल्वेला रोहावासीय प्रवाशांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी रोहा येथे संतप्त प्रवाशांनी या विस्ताराविरोधात ‘रेल रोको’ करून चिपळूणपर्यंत विस्तारित केलेली मेमू रद्द करायला भाग पाडली होती. यावेळी तशी वेळ येऊ नये, यासाठी रेल्वेने सावध पवित्रा घेत विस्तारित केलेली ही गाडी आधीच रद्द केली आहे.

दि. ८ मार्च 2024 पासून दिवा ते रोह्यादरम्यान धावणारी मेमू लोकल ट्रेन चिपळूणपर्यंत विस्तारित करण्यात आली होती. ही गाडी शून्य 01597/01598 या क्रमांकाने विशेष मेमू गाडी म्हणून चालवली जात होती.

‘ चिपळूण-दादर स्वतंत्र गाडी चालवावी’

रत्नागिरीतून दादरपर्यंत धावणारी पॅसेंजर गाडी कोरोना काळापासून दिव्यापर्यंतच धावत असल्याने मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासीय प्रवाशांना या गाडीचा उपयोग होत नाही. त्यामुळे ही गाडी पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत न्यावी, सावंतवाडी- दिवा एक्सप्रेस लो. टिळक टर्मिनस किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत चालवावी, रोहा- दिवा मेमू लोकल ट्रेनचा विस्तार करून या मार्गावरील नियमित प्रवाशांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा दादर ते चिपळूणपर्यंत स्वतंत्र गाडी चालवण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रवासी जनतेकडून केली जात आहे. कोकण तसेच मध्य रेल्वेने याबाबत गांभीर्याने विचार करावा, यासाठी कोकण विकास समितीने रेल्वेकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

दिवा ते रोहा या मार्गावर आधीच सेवेत असलेली गाडी विस्तारित करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवस ही गाडी विलंबाने धावत असल्याने चिपळूण येथून रोह्याला जाताना पुढे रोहा ते दिवा या नियमित फेऱ्यांना देखील विलंबाचा फटका सहन करावा लागत होता. यामुळे मागील अनुभव लक्षात घेता नियमित प्रवाशांचा रोष ओढवून घेण्याआधीच चिपळूण मेमूच्या 15 ते 30 मार्च 2024 पर्यंतच्या सर्व फेऱ्या रद्द केल्या आहेत. कोकणात होळीसाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी लाभदायक ठरत होती. विस्तारित केलेली गाडी रद्द करण्यात आल्याने आता चिपळूणपर्यंत येणाऱ्या प्रवाशांना पर्यायी गाडीची प्रतीक्षा लागली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE