युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणमध्ये पंचकोशाधारित गुरुकुल पद्धतीने चालणारी शाळा!

चिपळूण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसनाच्या हेतूने शिक्षणातले अनेक वेगवेगळे प्रयोग करणारी शंभर वर्षांहून जास्तीची शैक्षणिक परंपरा असणारी संस्था म्हणून जिल्हाभरात नावलौकिक असणारी परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण ही एक नावाजलेली शाळा. या शाळेचा एक भाग म्हणजे पंचकोशाधारीत गुरुकुल विभाग. गुरुकुल म्हणजे दिवसभराची पूर्णवेळ शाळा. उपनिषदे आणि आत्ताची शिक्षण पद्धती यांचा समन्वय साधून पंचकोश गुरुकुल ही संकल्पना दीर्घकालीन शैक्षणिक प्रायोगिक प्रक्रियेतून ३० वर्षे यशस्वीपणे सिद्ध करून दाखवणाऱ्या ज्ञानप्रबोधिनी निगडी प्रशालेच्या कै.वामनराव उर्फ भाऊ अभ्यंकर यांनी आधुनिक भारतीय शिक्षण पद्धतीला दिलेली एक नवीन संधी म्हणजे पंचकोश आधारित गुरुकुल. त्यांच्याच प्रेरणेतून त्यांच्याच संकल्पनेला अनुसरून परशुराम एज्युकेशन सोसायटीने आपल्या शतक महोत्सवी वर्षाच्या औचित्याने शैक्षणिक प्रगतीचं टाकलेलं पुढचं पाऊल म्हणजे युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणचे पंचकोशाधारित गुरुकुल !!

यावर्षी गुरुकुल विभागाची पहिली तुकडी दहावीच्या वर्गात प्रवेश करती झाली आहे अर्थात गुरुकुल सुरू होऊन अखंडित यशस्वीपणे चालू असल्याचे हे सहावे वर्ष! मर्यादित विद्यार्थी संख्या, त्यामुळे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, ११ तासांची पूर्ण वेळ शाळा, मुलांचा घरचा अभ्यास शालेय वेळेतच पूर्ण करण्याची व्यवस्था, मुलांना अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन व्यक्तिमत्व विकासाची नियमितपणे मिळणारी संधी, शिबिरे,क्षेत्रभेटी,कार्यशाळा यांमधून मिळणारे आनंददायी शिक्षण, नवीन शैक्षणिक धोरणात देखील समाविष्ट असलेल्या पंचकोश विकसनाची नियमित उपक्रमांमधून नकळत होणारी प्रक्रिया, नियमित व्यायाम योगासने सूर्यनमस्कार आणि मैदानी खेळ यामधून होणारे विद्यार्थ्यांचे शारीरिक विकसन, चित्रकला,हस्तकला, संगीत,वाद्य वादन,संगणक अशा अनेक गोष्टींमधून होणारे विद्यार्थ्यांचे कौशल्य प्रशिक्षण, व्यक्तीभेटी,व्यक्ती परिचय, संस्था भेटी, क्षेत्रभेटी, सामाजिक कार्यक्रमातील सहभाग यामधून होणारे सामाजिक जाणीवांचे विकसन, नियमित अभ्यासक्रमासाठी दिला जाणारा जास्तीचा वेळ, यामुळे त्या त्या विषयांचे होणारे वेगळ्या प्रकारचे आकलन अशी अनेक वैशिष्ट्ये गुरुकुल बाबत सांगता येतील.

दिनक्रम म्हणून सकाळ सत्रात व्यायाम-उपासना-पाठांतर-चिंतन, मधला संपूर्ण वेळ अनुक्रमे विषय निहाय शैक्षणिक तासिका, दिवसाच्या उत्तरार्धात स्वयंअध्ययन आणि सायंकाळी मैदानी खेळाने दिवसाचा समारोप अशा दिनक्रमाप्रमाणे वर्षभराचे नियोजन गुरुकुलाचे असते. याशिवाय प्रासंगिक कार्यक्रम, निवासी शिबिरे,कार्यशाळा, मातृभूमी परिचय शिबिरे असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांचे समृद्ध व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पूर्वनियोजित असतात. अन्नमय,प्राणमय,मनोमय,विज्ञानमय आणि आनंदमय या पाचही कोशांचा विचार करून विद्यार्थ्यांचे बौद्धिक,शारीरिक,मानसिक,भावनिक विकसन करण्यासाठी प्रयत्न केले जातात.


विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात,मानसिकतेत,वैचारिकतेत होणाऱ्या बदलांच्या नियमित निरिक्षणातून,नोंदीमधून विद्यार्थ्यांमध्ये झालेला आमुलाग्र बदल ठळकपणे लक्षात येतो. वर्षारंभ उपासनेने होणारी गुरुकुलाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि वर्षांत समारंभाने शैक्षणिक वर्षाचा समारोप असे वर्षभराचे कामकाज गुरुकुलाचे चालते. या सोबतच नियमित शाळेपेक्षा जास्त दिवस,जास्त वेळ चालणाऱ्या गुरुकुल मध्ये विषयनिहाय तज्ज्ञ आणि अनुभवी अध्यापकांकडून पूर्णवेळ मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी होण्यापेक्षा ज्ञानार्थी व्हावे यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून गुरुकुलामध्ये प्रयत्न केले जातात.पारंपरिकता जपत, आधुनिकता अंगिकारत व्यक्तिमत्व घडवणारी शाळा असे गुरुकुलचे वर्णन करता येईल. इयत्ता पाचवी पासून प्रवेश प्रक्रिया चालू होणाऱ्या गुरुकुल मध्ये पाचवी ते दहावीच्या सर्व वर्गांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. आवर्जून प.ए.सो.चिपळूण संचालित यु.इं.स्कूल चिपळूण च्या गुरुकुल विभागाला भेट द्या. गुरुकुल मध्ये आपले स्वागत!

गुरुकुल म्हणजे वेगळा विचार
गुरुकुल म्हणजे वेगळा आचार

गुरुकुल म्हणजे पारंपरिकता जपत
उज्ज्वल उद्याचा आधुनिक भविष्यवेध
सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न नेक

गुरुकुल म्हणजे ११ तासांची शाळा नियोजन बद्ध
गुरुकुल म्हणजे आनंददायी दिनक्रम शिस्तबध्द

या पहा जोडा अनुभवा इथली गंमत
हसा खेळा गाणी गा अभ्यासा सोबत
चाकोरी बाहेरच्या विचारांची सोबत
हटके उपक्रमांची इथे जणू पंगत
परंपरा जपत संस्कारांना रुजवत
कौशल्य आणि प्रगतीची अजोड संगत
आधुनिक होता होता पुराण आठवत
चहुदिश पैलूंनी व्यक्तिमत्व घडत
गुरुकुल मध्ये आपले स्वागत
गुरुकुल मध्ये आपले स्वागत

काव्य लेखन – अवधूत आणि भक्ती लाड इयत्ता

आठवी इ ( गुरुकुल )

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE