- उरण रेल्वे स्टेशन जवळील अपघात ; आरोपीवर कठोर कारवाई करण्याची जनतेची मागणी
उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण रेल्वे स्टेशनजवळ दि ६ एप्रिल २०२४ रोजी रात्री १०:४८ वाजण्याच्या सुमारास फोर व्हिलर कारने स्कुटीवरील चालक व त्याच्यासोबत असलेल्या कुटुंबियांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये स्कुटीचालक पवित्र मोहन बराल वय ४०,पवित्र यांची पत्नी रश्मिता पवित्र बराल वय ३७ वर्षे, राहणार बोरी पाखाडी, तालुका उरण, जिल्हा रायगड हे जागीच मृत्यूमुखी पडले तर पवित्र यांची लहान मुलगी परी पवित्र बराल हिला नवी मुंबईमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटना समजल्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. फिर्यादी अतुल राजेंद्र चव्हाण वय २६ वर्षे, आरसीएफ पोलीस कॉन्स्टेबल याच्या तक्रारी वरून केटा कार क्रमांक एम एच ४६ बी व्ही ५००० या वाहनाचे चालक जय चंद्रहास घरत राहणार म्हातवली, तालुका उरण, जिल्हा रायगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण अपघातामुळे उरणच्या जनतेत संतापाची लाट पसरली आहे. पवित्र बराल, रश्मिता बराल यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या जय चंद्रहास यांच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
अपघातग्रस्त व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये न नेता घटना स्थळावरून पळून जाणाऱ्या, अपघाताची माहिती कोणालाही न कळविणाऱ्या व जनतेशी उद्धट भाषा वापरणाऱ्या, अपघातास कारणीभूत असलेल्या जय चंद्रहास घरत यांच्यावर पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण उरणच्या नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
