चिपळूण (धीरज वाटेकर) : चिपळूण येथील कांगणेवाडी परीसरातील बालगोपाळांनी गुढीपाडवा दिनी नववर्ष स्वागताला परिसरातील घरोघरी पालखी फिरवली. पालखीसोबत असलेल्या आणि संस्कृती संवर्धनाचा संस्कार गिरवणाऱ्या या बालगोपाळांचे सर्वत्र उत्साहात स्वागत करण्यात आले.
कोकणात शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पालख्या घरोघरी फिरतात. त्यानंतर येणाऱ्या नववर्ष स्वागताला काही ठिकाणी अशा बालगोपाळांच्या पालख्या आनंदाचं, मांगल्याचं नि पावित्र्याचं वाटप करीत फिरतात. नुकत्याच पार पडलेल्या शिमगोत्सवात लहान मुलांना पालखी नाचवायाला, पालखीचे भोई व्हायला मिळत नाही. कोकणात काही गावात गुढीपाडव्याला मात्र बालगोपाळांची ही आवड पूर्ण होते. गुढीपाडवा हा निसर्ग आणि सृष्टीच्या सृजनशीलतेचा उत्सवकाळ आहे. या काळात शिशिराची पानगळ थांबून झाडांना नवीन पालवी यायला सुरुवात होते. सृष्टी नवोन्मेषशालिनीचे स्वरूप धारण करते. दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते.
