रत्नागिरी, दि. १८ : घरी जाऊन मतदान घेताना गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदान केंद्राध्यक्षांनी याबाबत काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, असे विशेष मार्गदर्शन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी केले.
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात निवडणूक कर्तव्यावर नेमलेले अधिकारी, कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील मतदारांना, तसेच ८५ वर्षावरील मतदार, दिव्यांग मतदार यांच्याकरिता विधानसभा मतदार संघातील नोडल पोस्टल कर्मचारी यांचे प्रशिक्षण काल आयोजित करण्यात आले होते. तहसिलदार तेजस्विनी पाटील यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर प्रशिक्षण दिले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकडवाड यांनी विशेष मार्गदर्शन केले. ते म्हणाले, घरी जाऊन मतदान घेताना सुक्ष्म निरीक्षक, पोलीस बंदोबस्त, चित्रीकरण तसेच केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहेत. उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी देखील उपस्थितीत असणार आहेत. त्यामुळे घरी जाऊन मतदान घेताना गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावयाची आहे. याबाबत मतदान केंद्राध्यक्षांनी काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मतपत्रिकेवर मतदान कसे नोंद करावयाचे आहे, हे मतदारांना सांगावयाचे आहे. त्याचबरोबर त्याची घडी कशी घालायची याबाबतही त्यांना कल्पना द्यायची आहे.

या प्रशिक्षणासाठी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, चिपळूणचे तहसिलदार प्रविण लोकरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
