नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात लढत
रत्नागिरी : मागील अनेक दिवसांपासून लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीकडून नेमकी कुणाला उमेदवारी जाहीर होते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर भाजपने याबाबतचा सस्पेन्स संपवला आहे. भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतील मुख्यालय प्रभारींकडून केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आहे.
मागील अनेक दिवसांपासून रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या विरोधात नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते.

या जागेवर केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे की पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
नारायण राणे उद्या नामनिर्देशन अर्ज भरणार!
रत्नागिरी संदर्भातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नारायण राणे हे उद्या दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांच्याकडे दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ना. राणे हे महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.
