रत्नागिरी शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी ; सर्वसामान्यांसह स्कूल बसेस, ॲम्बुलन्सनाही फटका!

  • महायुती उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहने आल्याचा परिणाम
  • बाहेरून आलेले कार्यकर्तेही ट्रॅफिक जाममध्ये अडकले

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणावर वाहने आल्याने रत्नागिरी शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. वाहतूक नियंत्रण करणारे पोलीसही या वाहतूक कोंडीपुढे हतबल झाले. यामुळे वाहतूक कोंडीतून बाहेर जाण्यासाठी लोक मिळेल त्या गल्लीतून वाहने घालताना दिसत होते. मात्र, पुन्हा मुख्य रस्त्यावर येताच अशा वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शुक्रवारी त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले.

महायुतीचे लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील विविध भागातून लहान-मोठी शेकडो वाहने रत्नागिरी शहरात दाखल झाली होती. आधीच शहरातील विविध रस्त्यांवर काँक्रीटीकरणाचे सुरू असलेले काम, सीएनजी गॅससाठी ठिकठिकाणी खोदलेले रस्ते आणि अचानक शहरात वाहनांची झालेली गर्दी यामुळे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. शुक्रवारी दुपारी बारा- साडेबारा वाजल्यापासून पुढे दीड दोन वाजेपर्यंत कडक उन्हाची काहीली सुरू असतानाच वाहतूक कोंडीत अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

स्कूल बसेससह रुग्णवाहिकांनाही फटका

रत्नागिरी शहरात शुक्रवारी झालेल्या या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस, विद्यार्थी वाहतुकीच्या रिक्षा यांच्यासह रुग्णवाहिकांनाही बसला. काही ठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनही अडकलेल्या पाहायला मिळाल्या.

महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाण मारुती मंदिर येथे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून कार्यकर्ते जमायला लागले होते. शहराबाहेरून आलेली असंख्य वाहने आणि त्यातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी यामुळे रत्नागिरी शहरातील वाहतुकीवरील ताण अचानक वाढला. शहरातील या मध्यवर्ती ठिकाणावरून विविध दिशांना जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक अक्षरश: मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. अशातच डोक्यावर प्रचंड ऊन असल्यामुळे शुक्रवारच्या या वाहतूक कोंडीत फसलेल्या लोकांच्या तोंडातून वाहतुकीचे योग्य नियमन  न झाल्यामुळे अक्षरश: लाखोल्या निघत होत्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE