रत्नागिरी, दि. 24 : सुक्ष्म निरीक्षकांनी गृह मतदान तसेच मतदान केंद्रांवरील आपल्या सेवेबाबत गांभीर्यतेने आणि लक्षपूर्वक कामकाज करावे, असे निर्देश सर्वसाधारण निरीक्षक राहूल यादव यांनी दिले.
येथील अल्प बचत सभागृहात आज सुक्ष्म निरीक्षकांची आढावा बैठक झाली. या बैठकीला उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये उपस्थित होते.

सर्व साधारण निरीक्षक श्री. यादव यांनी सुक्ष्म निरीक्षकांच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तुमच्याकडे जबाबदारीचे काम आहे. कोणताही ताण न घेता तुमची जबाबदारी पार पाडा. मतदान केंद्रांवर सुविधा आहेत का नाहीत, याबाबत तुमच्याकडील तपासणी यादीप्रमाणे पाहाव्यात. विशेषत: यात पाणी, वीज, रॅम्प, स्वच्छतागृहे पाहावीत. मॉकपोल झाले की नाही, त्याबाबतचा डाटा क्लिअर केला का, याबाबत दक्ष रहावे.
गृह मतदाना वेळीही तुम्हाला उपस्थित रहायचे आहे. यात गोपनीयता राखली गेली का, ते पहायचे आहे. लक्षपूर्वक सर्वांनी कामकाज करावे. त्यासाठी आपले कर्तव्य आणि कामकाज समजून घेण्यासाठी हॅंडबुक वाचावे, असेही ते म्हणाले.
