मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये उमटणार कोकणी कलेची छाप!

  • अजित मते यांच्या चित्रांचे प्रदर्शन ; ७ ते १३ मे दरम्यान प्रदर्शन पाहण्याची संधी

संगमेश्वर दि. ५  :  रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील दहिवली येथील युवा चित्रकार आणि कालुस्ते येथे कला शिक्षक म्हणून काम करणारे अजित भगवान मते यांच्या चित्रांचे प्रदर्शन ७ मे ते १३ मे दरम्यान वरळी , मुंबई येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मध्ये भरणार आहे. कला रसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन कोकणातील ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांनी केले आहे. मते यांच्या चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने कोकणातील कलाकाराची भावमुद्रा वरळी येथील आर्ट गॅलरीत उमटणार आहे.

चित्रकार अजित भगवान मते हे कालुस्ता येथील हाजी दाऊद अमिन हायस्कूल येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना कलेचे धडे देत असताना स्वतःला एका वेगळ्या विश्वात रमवणारे अजित मते हे एक प्रयोगशील चित्रकार म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात ओळखले जातात. आपल्या चित्रांमध्ये सातत्याने काहीतरी नवनवीन प्रयोग करण्यावर मते यांचा नेहमीच भर असतो. स्वतःची स्वतंत्र कलाशैली त्यांनी विकसित केली असून या शैलीतच ते आपली कला निर्मिती करत असतात. यातूनच त्यांनी ” माझा देव ” या आगळ्यावेगळ्या विषयावर चित्रांची निर्मिती केली आहे. मते यांच्या चित्रातून कलारसिकांना त्यांच्या मनातील भगवान श्रीकृष्ण अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे.

कला शिक्षण अजित मते

जीवन जगताना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. जे हवेचे वाटते तेच हातातून निसटून जाते. अनेक गोष्टी सोडाव्या लागतात, त्यांचा त्याग करावा लागतो. परंतु आयुष्यात काही सोडावं लागलं तरी आनंदी कसं राहायचं ? हातातून निसटलेल्या गोष्टींचा, सणांचा , स्वप्नांचा , आठवणींचा सोहळा कसा करावा ? हे भगवान श्रीकृष्ण शिकवतात . अजित मते यांनी या विचारांनी प्रभावित होऊन श्रीकृष्णाच्या जीवनावर चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. चित्र रेखाटता रेखाटता मते यांचा कुंचला आणि मन जणू श्रीकृष्णमय होऊन गेले. आपल्या चित्रात मते यांनी शीतरंगसंगतीचा अधिकाधिक वापर केला आहे. या रंगामुळे चित्रांमध्ये अपेक्षित खोली, वातावरणातील शांतता – प्रसन्नता आणि अपेक्षित परिणाम साधण्यात चित्रकार अजित मते यांना यश आले आहे.

मते यांनी आपल्या मोठ्या भावाच्या प्रेरणेतूनच स्वतःचे कलाशिक्षण पूर्ण केले आहे. अजित मते यांनी आजवर विविध प्रदर्शनात भाग घेतला असून, त्यांच्या चित्रांना अनेक प्रारितोषिके प्राप्त झाली आहेत ” माझा देव ” या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ७ मे रोजी होणार असून हे प्रदर्शन १३ मे २०२४ पर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले असणार आहे. सह्याद्री कला महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, प्राचार्य चित्रकार माणिक यादव, ज्येष्ठ चित्रकार विष्णु परीट , रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी आणि कलाशिक्षक, कालच ते हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी आदींनी प्रदर्शनानिमित्त चित्रकार अजित मते यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE