उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील उरण – पनवेल महामार्गवरील प्रसिद्ध करळफाटा येथील करळ,सोनारी आणि सावरखार या तिन्ही गावातील नागरिकांसाठी असलेल्या बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. यामुळे या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्याचप्रमाणे स्थानकाचा स्लॅब तुटल्याने याचा धोका निर्माण झाला आहे.
जेएनपीए प्रशासनाने या स्थानकाची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. जेएनपीए सारख्या जागतिक पातळीवरील बंदराच्या हद्दीत मोडणाऱ्या करळ,सोनारी व सावरखार हे तीन गावे आहेत. या परिसरात अनेक सुविधा जेएनपीएने दिल्या आहेत. बंदराला जोडणारे रस्ते तयार करण्याचे काम सूरु आहे. मात्र त्याचवेळी एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या करळ फाटा आता नष्ट झाला आहे.
जेएनपीए साडेबारा टक्केचा दिबांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या लढ्याची व प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी झालेल्या मोर्चे आंदोलनाची खरी साक्ष ही करळफाटा होता. या फाट्यावरून प्रवास करणाऱ्या तीन गावातील नागरिक आणि प्रवासी हे येथील बस साठी येथील स्थानकातून प्रवास करीत आहेत. मात्र हे स्थानक नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
