खेड : कोकण किनारपट्टीवर असह्य उन्हाळा जाणवत असतानाच शनिवारी (११ रोजी) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसासह वादळी वार्याने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडवली. याचदरम्यान, शहरातील ब्राह्मणआळी मार्गावर जुनाट वृक्ष उन्मळून पडल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद पडला होता.
खेड व भरणे परिसरात शनिवारी सकाळपासून उष्मा वाढल्याचे जाणवत होते. त्यामुळे शहरातील रस्त्यावर दुपारी 12 ते 3 या कालावधीत रहदारी विरळ होती. परंतु, उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर अनेकजण चालत, दुचाकी व चारचाकी वाहने घराबाहेर पडले. परंतु सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक ढगांनी गर्दी केली आणि सोसाट्याच्या वार्याने हवेत धुरळ्याचे लोळ उठले. वादळ सुटल्याने अनेकांनी सुरक्षित ठिकाण गाठून वारा थांबण्याची वाट पाहिली. शहरात सोसाट्याच्या वार्याने धुळीचे लोळ हवेत उठल्याने पडचार्यासह दुचाकी व चारचाकी वाहनचालक यांची भीतीने घाबरगुंडी उडाली.
सोसाट्याच्या वार्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. ब्राह्मणआळी परिसरात नाना – नानी पार्क जवळ जुना वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडल्याने येथे वाहतूक ठप्प झाली. सोसाट्याच्या वार्या नंतर खेड व भरणे परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वादळ व अवकाळी पावसाने आंबा व्यापारी मात्र धास्तावले असून बाजारपेठेत आंब्याचा दर कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
