- प्रवासापूर्वी गाडीची अचूक वेळ तपासून घेण्याचे आवाहन
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांसाठी उद्या दिनांक 10 जून 2024 पासून पावसाळी वेळापत्रक लागू होत आहे. दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका असलेल्या भागातून गाड्यांच्या वेगावर नियंत्रण येत असल्यामुळे कोकण रेल्वेकडून दरवर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाते. या बदलामुळे प्रवाशांनी आपण प्रवास करीत असलेल्या गाडीची वेळ प्रवासापूर्वी तपासून घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळणे, मार्गावर चिखल माती येणे, पावसाचे पाणी येऊन मार्ग विस्कळीत होणे अशा बाबी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी पावसाळी वेळापत्रक आखले जाते. त्यानुसार काही गाड्यांच्या वेळा बदलाव्या लागतात तर काही गाड्यांची फ्रिक्वेन्सी बदलावी लागते. या कारणामुळेच कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस, मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस चालवल्या जातात. इतर वेळी वंदे भारत एक्सप्रेस सहा दिवस तर तेजस एक्सप्रेस आठवड्यातून पाच दिवस चालवली जाते. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी एक्सप्रेस आठवड्यातून दोनच दिवस चालवण्यात येते.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
याचबरोबर मेंगलोर -मुंबई एक्सप्रेस, मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस तसेच मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस या अप दिशेने धावणाऱ्या गाड्यांच्या रत्नागिरीपर्यंतच्या वेळापत्रकात मान्सून वेळापत्रकानुसार बदल होतो. दिनांक 10 जूनपासून होत असलेल्या बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी पावसाळी वेळापत्रकानुसार आपल्या गाडीचे अचूक वेळ तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे.
