आता एसटीच्या प्रत्येक आगारात साजरा होणार ‘प्रवासी राजा दिन’

  • दर सोमवारी व शुक्रवारी आयोजन ; १५ जुलैपासून सुरुवात


उरण दि ४ (विठ्ठल ममताबादे ) : प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी ” प्रवासी राजा दिन ” आयोजित करण्यात येणार आहे.

या दिवशी एसटीचे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सुचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल! असे मत एसटी महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केले आहे.

ही अभिनव योजना १५ जुलै पासून सुरू होणार आहे. प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये यांनी आपल्या समस्या-तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडू शकतात. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील. ” प्रवासी राजा दिन ” कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्या, त्या वेळी जाहीर करतील. विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्ररीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे, यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे.

एसटीच्या विविध बसेस मधून दररोज सुमारे ५४ ते ५५ लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. प्रवाशांना एसटी बसस्थानक, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ, निर्जंतुक ‍आणि टापटीप असावीत असे वाटते. तसेच एसटी बसेस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. यासंबंधित प्रवाशी तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होऊ शकते. प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक असते. तसे झाल्यास प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे एसटी महामंडळाला शक्य होणार आहे. अर्थात, प्रवाशांचे महत्तम समाधान हा उद्देश ठेऊन येत्या १५ जुलै पासून ” प्रवासी राजा दिन ” या अभिनव योजनेचे आयोजन करण्यात येणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE