- जेवणाची ऑर्डर देऊन पैसे द्यायला नकार ; उलट स्थानिक महिलेकडून उकळले पैसे ; ग्रामस्थांनी चोपले
लांजा : माचाळ येथील पर्यटन केंद्राच्या ठिकाणी जेवण बनवून देणाऱ्या स्थानिक महिलेला जेवणाचे पैसे न देता उलट तुमचा वीज मीटर फॉल्टी आहे, अशी बतावणी करून पैसे उकळणाऱ्या पर्यटकांना येथील ग्रामस्थांनी चोप दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. घटना शुक्रवारी घडली आहे. या घटनेत काही प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने खळबळ उडाली आहे.

लांजा तालुक्यातील माचाळ आहे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीला आहे. वर्षा पर्यटनासाठी समुद्रसपाटीपासून उंच असणाऱ्या या माचाळ ला पर्यटकांची मोठी पसंती आहे. शुक्रवारी लांजातील तीन लोक माचाळ ठिकाणी आले होते. येथील एका महिलेकडे या तिघांनी जेवणाची ऑर्डर दिली. दुपारी मौजमस्ती झाल्यानंतर जेवण झाले. जेवणाचे बिल मागितले असता या पर्यटकांनी बिल देण्यास नकार दिला.
या पर्यटकांनी तुमचा वीज मीटर फॉल्टी आहे. तुम्ही दुसऱ्याकडून वीज घेतले आहे, असे सांगून तुम्हाला वीस हजार रुपये दंड होईल, असे सांगितले. इतक्यावरच न थांबता उलट या महिलेकडून दोन हजार रुपये घेतले. दरम्यान, महिलेला फसवल्याची माहिती माचाळ गावातील ग्रामस्थांना समजली तातडीने ग्रामस्थ जमा झाल. चार चाकी वाहन घेऊन आलेल्या या तिघांना ग्रामस्थांनी ताब्यात घेतले आणि फसवणुकीचा जाब विचारला. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चांगलाच त्यांना चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. येथील ग्रामस्थांनी माचाळ येथे येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या ओळखीचा पुरावा देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
