नाणीज, दि. १९ : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी काढली. चिमुकल्या वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा, टाळाचा गजर, अभंगाच्या तालावर मुलांनी धरलेला ठेका, यामुळे दिंडी लक्षवेधी ठरली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉ.अबोली पाटील व प्रशालेचे ज्येष्ठ प्राध्यापक कीर्ती कुमार भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर नामघोषात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याची पालखी प्रशालेच्या बालचिमुकल्यांनी उचलली व दिंडी प्रशालेपासून सुरू झाली. ती सुंदरगडावरील संतपीठाकडे व संतशिरोमणी गजानन महाराज यांच्या मुख्य मंदिराकडे निघाली.
दिंडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात पर्यावरण जागृती, स्वच्छता, स्वच्छ पाण्याची गरज असे जागृतीचे फलक मुलांच्या हाती होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून व पेहरावातून
भारतीय संस्कृतीच्या वारशाचे दर्शन घडवले. ती जपली पाहिजे असे सूचित केले जात होते.
दिंडी मंदिरामध्ये पोहोचताच गुरु माता सौ. सुप्रियाताई व सौ. ओमेश्वरी वहिनीसाहेब यांचे पाद्य पूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते मुख्य मंदिरांमधील सर्व देवतांचे व जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुलांनी अभंग गायिले. त्यांच्या अभंगांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या गाथेवर एक नाटुकली सादर करण्यात आली. त्याने भाविक आनंदून गेले. त्यानंतर रिंगण सोहळा झाला. त्यात जुन्या पारंपारिक खेळांचे प्रदर्शन करण्यात आले. रिंगण सोहळा अप्रतिम व उत्कृष्टरित्या सादर केला. दिंडी कार्यक्रमाबद्दल गुरुमातानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व संपूर्ण सोहळ्याची प्रशंसादेखील केली.

यावेळी आषाढी एकादशीचे महत्व प्रशालेच्या मुख्याध्यापिका अबोली पाटील यांनी सांगितले. शेवटी विद्यार्थ्यांनी सर्व देवतांच्या आरत्या केल्या व पसायदानाने समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सौ. विद्या लिंगायत यांनी केले.
