- कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना जनरलचे डबे वाढवले
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांची कोच रचना बदलताना रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांचे हित लक्षात घेऊन वातानुकूलित व स्लीपर श्रेणीच्या डब्यांची संख्या कमी करून जनरल श्रेणीचे डबे वाढविले आहेत. यामुळे आरक्षण न मिळालेल्या आणि आयत्या वेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली (22113/22114) या एक्सप्रेस गाडीचा थ्री टायरचा एक आणि स्लीपरचा एक असे दोन डबे कमी करून त्या ऐवजी जनरल श्रेणीचे डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आधी या 22 डब्यांच्या गाडीला जनरलचे दोन डबे होते आता ते चार झाले आहेत. सर्व श्रेणीतील डब्यांची एकूण संख्या पूर्वीप्रमाणेच 22 इतकीच आहे. हा बदल लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान धावताना दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पासून तर कोचुवेली येथून मुंबईसाठी धावताना दोन डिसेंबर 2024 पासून होणार आहे.
याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान 22 एलएचबी डब्यांसह धावणाऱ्या गाडीला (11099/11100) पूर्वी स्लीपरचे आठ डबे होते आता ते सहा करून त्याऐवजी जनरल श्रेणीचे दोन डबे वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या गाडीला पूर्वीच्या जनरलच्या दोन डबे ऐवजी जनरल चे चार डबे होणार आहेत. आयत्या वेळी प्रवासाला निघणाऱ्या प्रवाशांची यामुळे सोय होणार आहे. याही गाडीची एकूण डब्यांची संख्या पूर्वीप्रमाणे 22 इतकीच आहे. या गाडीचा हा बदल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक एक डिसेंबर 2024 पासून तर मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस या प्रवासात दिनांक 2 डिसेंबर 2024 पासून लागू होणार आहे.
