‘हर घर तिरंगा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

    रत्नागिरी, दि. ८ : ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम गेले दोन वर्ष लोक चळवळ बनली आहे. याही वर्षी हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील प्रांताधिकारी, तहसिलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


    जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दि.9 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम आयोजित करावेत. नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी खादी ग्रामोद्योग, बचतगट आदींच्या माध्यमातून शहरातील प्रमुख ठिकाणी स्टॉल ठेवून तिरंगा अनुषंगिक साहित्य उपलब्ध करावे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून तिरंगा यात्रा काढावी. सेल्फी पॉईंट तयार करावेत. जागोजागी तिरंगा कॅनव्हास नगरपरिषदेने उपलब्ध करावेत.

    घरोघरी तिरंगा अभियानात प्रत्येक घरावर दिनाकं 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ध्वज फडकविण्यात येणार आहे. याही वेळी प्रत्येकाला आपली तिरंगा सोबत काढलेली सेल्फी शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळ https://www.harghartiranga.com/ वर उपलोड करावयाची आहे.

    एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.


    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑगस्ट क्रांती मैदानावर दि.9 ऑगस्ट रोजी या अभियानाची राज्यस्तरावरुन सुरूवात होणार आहे. यानंतर सर्व राज्यात प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे.  प्रत्येक गाव, शहरांमध्ये ध्वज उपलब्ध करून देण्याबाबत ग्राम विकास विभाग व नगर विकास विभाग समन्वय साधतील. यामध्ये पोस्ट ऑफिस, खादी ग्रामोद्योग, खाजगी आस्थापना, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग असेल. सर्व प्रकारची शासकीय निमशासकीय कार्यालये, आस्थापना, प्रतिष्ठाने यांनीही या उपक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे.

    Digi Kokan
    Author: Digi Kokan

    Leave a Comment

    READ MORE