शिवसेनेचे शिष्टमंडळ भेटले मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना
रत्नागिरी : दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्या जागी गोरखपुर तसेच बलिया मार्गावर रेल्वे गाडी सुरू केल्याने संताप व्यक्त करीत रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी मध्य रेल्वेच्या महाप्रवज्ञकांची भेट घेऊन ही गाडी पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी केली. मध्य रेल्वेने याला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे बोर्डाकडे तसा पाठवणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

दादर ते रत्नागिरी अशी जवळपास 20-22 वर्षे सुरू असलेली गाडी कोरोना काळात बंद करण्यात आली. त्या बदल्यात रत्नागिरी ते दिव्यापर्यंत मर्यादित मार्गावर सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र पालघर, वसई, विरारपासून मुंबईतील उपनगरी भागात राहणाऱ्या कोकणवासियांसाठी दादर हे सोयीचे ठिकाण असल्याने दादर जंक्शन वरूनच पूर्वीप्रमाणे रत्नागिरीसाठी पॅसेंजर सुरू करावी, यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांमार्फत अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे.

ही गाडी बंद केल्याने प्रवाशांची होत असलेली गैरसाई लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिष्टमंडळ प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन गुरुवारी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना भेटले. दादर ते रत्नागिरी ही गाडी पूर्वीप्रमाणेच सोडण्याची मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक तसेच चीफ ऑपरेटिंग मॅनेजर यांच्याकडे केली. आता याची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होते, याकडे कोकणवासी रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.
मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला सामोरे जाताना दादर रत्नागिरी पॅसेंजर संदर्भात प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्याबाबत आश्वस्त केले.
