रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली येथील उड्डाणपुलाखालील अंडरपास रस्ता तसेच पुलाच्या बाजूने बाजारपेठेतून जात असलेल्या सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झाल्याने त्याचे डांबरीकरण व उर्वरित काम पूर्ण करण्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी ग्रामस्थांच्या वतीने दिनेश परकर यांनी दि. ८ जानेवारी २०२५ रोजी पोलिसांसह सर्व संबंधितांना निवेदन दिले आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दोन्ही मार्गीकांचे आरवली येथील काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, मोठी वर्दळ असलेल्या येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या रस्त्यावरील खडी वर आल्याने ग्रामस्थांना वाहनांमुळे उडणाऱ्या धूळ- मातीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करून उर्वरित काम पूर्ण करावे, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने दिनेश परकर यांनी प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, याची दखल घेऊन चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी दि. १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ग्रामस्थांच्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर महामार्ग ठेकेदाराकडून हे काम २६ जानेवारी पूर्वी पूर्ण करून ग्रामस्थांच्या समस्येचे निराकरण केले जावे, अशी मागणी केली आहे.
