- मध्य रेल्वेच्या उपमहाप्रबंधकांकडून शिष्टमंडळाला आश्वासन
- माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिला रेल्वेला ‘अल्टीमेटम’
- अन्यथा १ मार्चला दादर येथून गोरखपुर/ बलिया ट्रेन सोडू देणार नाही
मुंबई : कोकणातील सर्वसामान्यांची दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्याच प्लॅटफॉर्मवरून त्याच वेळेत गोरखपुर तसेच बलिया मार्गावर गाड्या चालवणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाला माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज दणका दिला. दि. ९ जानेवारीला दिलेल्या पत्राची आठवण करून देत ही गाडी पूर्वीप्रमाणे दादर येथून सुटली नाही तर येत्या १ मार्चला गोरखपूर आणि बलिया ट्रेन सुटू देणार नाही, असा सज्जड इशारा कोकणवासीयांच्या वतीने मध्य रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.

जवळपास वीस वर्षे दादर जंक्शनवरून रत्नागिरीसाठी सुटणारी पॅसेंजर गाडी कोरोना काळात बंद करण्यात येऊन दिवा येथून ती सोडली जात आहे. ती पूर्वीप्रमाणेच सोडली जावी म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिनांक ९ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयात महाप्रबंधकांची भेट घेऊन दादर ते रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी पूर्वीप्रमाणेच दादर जंक्शनवरून सोडण्याची मागणी केली होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून कोकणवासीयांचा समावेश असलेल्या विविध प्रवासी संघटनांचा यासाठी लढा सुरू आहे.

येत्या आठवडाभरात दादर- रत्नागिरी पॅसेंजरचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवून त्या संदर्भात काय स्थिती आहे आहे, याची माहिती दिली जाईल.
–उपमहा प्रबंधक, मध्य रेल्वे.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार विनायक राऊत यांनी रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन बुधवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेला स्मरणपत्र दिले आहे. या स्मरणपत्रात म्हटल्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे दादर ते रत्नागिरी ही पॅसेंजर सुरू झाली नाही तर येत्या दि १ मार्च २०२५ रोजी गोरखपूर / बलिया मार्गावर सोडल्या जाणाऱ्या गाडीसमोर रेल रोको आंदोलन करून ही गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी मध्य रेल्वेच्या उपमहाप्रबंधकांना प्रत्यक्ष भेटून दिला आहे. हे स्मरणपत्र त्यांनी बुधवारी सायंकाळी त्यांना सुपूर्द केले आहे.
