कुंभमेळ्यातून परत येताना भीषण अपघात ; रत्नागिरीतील तिघांचा मृत्यू

सिन्नर :  सिन्नरजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघात रत्नागिरीतील तिघांचा मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले. उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातून घरी परतणार्‍या रत्नागिरीकरांच्या इनोव्हा कारचा पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये रत्नागिरीतील माजी प्राचार्य व मराठा समाजाचे नेते प्रतापराव सावंतदेसाई यांच्यासह युवा उद्योजकाचा समावेश आहे.

रत्नागिरी शहर परिसरातील सात भाविक उत्तरप्रदेशात प्रयागराज तीर्थ येथे महाकुंभमेळ्यासाठी गेले होते. शुक्रवारी रात्री ते नागपूर येथून समृध्दी महामार्गाने इगतपुरीच्या दिशेने इनोव्हा कारने (क्र. एमएच. 08 बीई 6006 ) नागपूर-इगतपुरीकडे येत असताना सिन्नर तालुक्यातील वावीजवळील मलढोण शिवारात चॅनल नंबर 545 वर महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या अज्ञात वाहनावर इनोव्हा कार धडकली. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाचे सुरक्षा अधिकारी मिलिंद सरवदे यांच्या पथकाने व महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिर्डी येथील बचाव पथकातील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने सिन्नरच्या परमसाई व ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

या अपघातात इनोव्हा कारच्या पुढच्या बाजूचा चक्काचूर झाला. यात प्रतापराव सावंतदेसाई (69, खेडशी), भगवान झगडे (50, खेडशीनाका) यांचा जागीच मृत्यू झाला तर अथर्व किरण निकम (24) याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. गाडीमधील प्रांजल प्रकाश साळवी (24), किरण वसंत निकम (58), रमाकांत पांचाळ (60) व संतोष रेडिज (60) हे गंभीर जखमी झाले आहेत.
गंभीर जखमी झालेले संतोष रेडीज हे रत्नागिरीतील प्रसिध्द श्रीराम मंदिराचे विश्वस्त आहेत तर किरण निकम हे 31डिसेंबर रोजी सिंधुदुर्गमधून लेखापरिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. रमाकांत पांचाळ हे सेवानिवृत्त आहेत.

 

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE