चिपळूण : मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी ज्ञानप्रबोधिनी तर्फे सलग 29 व्या वर्षीआयोजित केलेल्या राज्यस्तरीय समूहगीत स्पर्धांमध्ये युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणच्या गुरुकुल विभागाने पाचही स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थी समूहगान, पोवाडा, अध्यापक समूह गान सूर्यनमस्कार आणि श्रमदान या सर्व स्पर्धांमध्ये मुलांनी अतिशय उत्साहाने आपले सादरीकरणे केली.
या स्पर्धेतील विद्यार्थी समूहगान या स्पर्धेत मुलांनी
‘भारतवासी आम्ही सारे दिग्विजयी होऊ’ हे नवीन गीत सादर केले.भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुकुलातीलच विद्यार्थी व अध्यापकांनी तयार केलेले नवीन गीत गुरुकुलातील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित सादर केले.या सादरीकरणाला कोकण विभागातून तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
त्याचबरोबर चालू वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तीनशेवे जन्मशताब्दी वर्ष, या यानिमित्ताने गुरुकुलातील अध्यापक श्री.पराग लघाटे यांनी शब्दबद्ध व संगीतबद्ध केलेला अहिल्याबाईंचा पोवाडा गुरुकुलाच्या संगीत विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केला. या पोवाड्याच्या सादरीकरणाला कोकण विभाग स्तरावरती प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतला सहभाग एक अभ्यास प्रक्रिया म्हणून अनुभवला. स्पर्धेच्या अनुषंगाने भारताचा सांस्कृतिक, प्राकृतिक अभ्यास करत करत गीत रचना, शब्दबद्धता आणि चाल अशा दृष्टिकोनातून नवीन गाणं तयार करण्याचा अनुभव घेत घेत त्याला सरावाची जोड देत ते नेमकेपणाने समूहगीत व पोवाडा सादरीकरण करण्याची प्रक्रिया मुलांना निश्चित आनंद देणारे ठरली. या स्पर्धेसाठी गुरुकुल विभाग प्रमुख श्री.मंगेश मोने सर आणि गुरुकुलातील सर्व अध्यापकांनी विशेष मेहनत घेतली.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रम मनोहर सभागृह नवनगर विद्यालय निगडी येथे संपन्न झाला. संस्थेच्याच पोफळी प्रशालेच्या अध्यापक सहकाऱ्यांनी गुरुकुल विभागामार्फत प्रतिनिधि म्हणून पारितोषिक स्वीकारले.
गुरुकुल विभागाच्या या स्पर्धेतील यशाबद्दल
परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच पदाधिकारी आणि युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.संजय बनसोडे, पर्यवेक्षक श्री.संदीप मुंढेकर यांनी गुरुकुलच्या मुलांचे कौतुक केले.
