राई बंदरातील हाऊस बोट सेवा पर्यटकांसाठी खुली

  • सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे राई बंदरात लोकार्पण
  • उद्योग उभारणीसाठी, रोजगार निर्मितीसाठी महिला भगिनींनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत


रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास 35 टक्के सबसिडी दिली जाते. महिला भगिनींनी कर्ज घेऊन उद्योग उभे करावेत. तो वाढवून रोजगार निर्मिती करावी, त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केला.

जिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुरत्न समृध्द योजना 2023-24 पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते राई बंदरात आज झाले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विजय जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, विजय पाटील, सतीश शेवडे, सरपंच श्रृती शितप आदी उपस्थित होते.
फित कापून हाऊस बोटीचे लोकार्पण केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून देशात पहिल्यांदा हाऊस बोट आज इथे आहे. जिल्ह्यामध्ये अशा आणखी 4 हाऊस बोटी येणार आहेत. हा प्रकल्प अतिशय चांगला आहे. निसर्गरम्य वातावरणात तो निश्चितपणे देशात आदर्शवत ठरेल. हा रत्नागिरी पॅटर्न राबविण्यासाठी सर्वजण पुढाकार घेतील. काश्मिर आणि केरळनंतर रत्नागिरीतही हाऊस बोटी आहेत, असे अभिमानाने सांगता येईल. महिला प्रभाग संघांना देण्यात आलेली टुरिस्ट वाहनेही सातत्याने आरक्षित असतात. आणखी 6 वाहने द्यायची आहेत. ही वाहने चालविणारे चालक व वाहक दोघीही महिला असाव्यात. त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी माझी राहील.
सद्याच्या युगात महिला पायलट सर्वात उत्तम विमाने चालवत आहेत. त्याप्रमाणे हाऊस बोटीची कॅप्टन देखील महिला असावी. जिल्ह्यामध्ये सुरु केलेले उपक्रम पुढे चालू ठेवणे, ही देखील आपली जबाबदारी आहे. महिला भगिनींनी उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे, त्यासाठी मानसिकता असावी. हाऊस बोटीच्या प्रकल्पाजवळ खाऊ गल्ली तयार करा. त्यासाठी पुढाकार घ्यावा. न्याहरी निवास योजना चळवळ म्हणून राबविण्यासाठी उमेदने पुढाकार घ्यावा. त्यामध्ये महिलांनी चांगले काम करावे, असेही पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला एकता महिला प्रभाग संघांच्या स्वरा देसाईंसह विविध बचतगटांचा महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE