एल. ई. डी. दिवे लावून मासेमारी करणारी नौका जप्त

आचरा (सिंधुदुर्ग) :  दि. २५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास आचरा किनाऱ्याजवळील सागरी हद्दीत अनधिकृत एल.ई.डी. दिवे लावून मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यात आली. मत्स्य व्यवसाय परवाना कक्ष, देवगडचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी श्री. पार्थ तावडे व त्यांच्या पथकाने नियमित गस्त घालत असताना ही कारवाई केली.

या घटनेतील नौका विघ्नहर्ता-५ (नोंदणी क्रमांक IND-MH-5-MM-228) ही अनिल कामत (रा. मालवण) यांच्या मालकीची असून, ती राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवानाधारक आहे. मात्र, ही नौका आचरा किनाऱ्याजवळील जलधी क्षेत्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाइटच्या सहाय्याने मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. नौकेवर तांडेलसह पाच खलाशी उपस्थित होते.

खलाश्यांच्या प्राथमिक चौकशीत सदर नौका सतिश आचरेकर (रा. राजकोट, ता. मालवण) यांनी मासेमारीसाठी घेतल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान नौका जप्त करून देवगड बंदरात आणण्यात आली असून, त्यावर कोणतीही मासळी आढळली नाही. तसेच, नौकेवरील एल.ई.डी. लाइट, जनरेटर आणि इतर साधने अंदाजे ५ ते ६ लाख रुपये किमतीची जप्त करून कार्यालयात ठेवण्यात आली आहेत.

ही कारवाई मत्स्य विभागाच्या पथकाने सागरी सुरक्षा रक्षकांच्या सहकार्याने केली. कारवाईनंतर अंमलबजावणी अधिकारी श्री. पार्थ तावडे यांनी प्रतिवेदन सादर केले असून, पुढील सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE