देवराईंच्या जमिनी देवस्थानांच्या नावावर पूर्ववत होण्यासाठी १० मार्चला रत्नागिरीत घंटानाद आंदोलन

रत्नागिरी : कोकणातील अनेक देवस्थानांच्या देवराई तथा देवरहाटी जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांमधून देवस्थानांची नावे देवस्थानांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता बेकायदेशिररित्या कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे देवराई तथा देवरहाटी जमिनी या देवस्थानांच्या नावावर पूर्ववत कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्त, भाविक – भक्त, हिंदू यांच्या वतीने सोमवार, १० मार्च २०२५ या दिवशी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जयस्तंभ, रत्नागिरी येथे सनदशीरमार्गाने घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
कोकणातील रत्नागिरी व सिधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात देवराई तथा देवरहाटी असून ते धार्मिक महत्त्व असलेले पवित्र उपवन असते. या देवराई या त्यामधील स्थापित असलेल्या देवांच्या नावावर असतात. या जमिनी पारंपरिक स्वरूपात देवस्थानांच्या आधिपत्याखाली असून त्या धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. देवराई तथा देवराहाटी या जमिनी केवळ धार्मिक उपासनेसाठीच नव्हे, तर पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी देखील आवश्यक आहेत. अनेक वर्षांपासून या जमिनी देवस्थानांच्या ताब्यात होत्या आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या धार्मिक भावना आणि परंपरा जपल्या जात होत्या. मात्र शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा स्थानिक जनतेची कोणतीही समुपदेशन प्रक्रिया न करता या जमिनी शासनाच्या नावे केल्यामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक व सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन झाले असून याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. देवराई तथा देवरहाटी जमिनी पूर्ववत देवस्थानांच्या नावे करण्यात याव्यात, या मागणीसाठी रत्नागिरी येथे १० मार्चला घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक श्री. संजय जोशी यांनी दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE