उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : मास्टर्स गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित केलेली ७ वी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा ६ ते ९ मार्च २०२५ या कालावधीतं राऊरकेला, ओडिशा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वीचे अध्यक्ष आणि श्री समर्थ कृपा स्पोर्ट्स आणि करिअर अकॅडमी दादरपाडा चे सहाय्यक प्रशिक्षक स्नेहल राम पालकर यांनी ३५ वर्षावरील पुरुष वयोगटात सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी ४०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले तर १५०० मीटर धावणे या स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले आहे.
याबरोबर खोपोली येथील सहकारी अमित पांडुरंग विचारे यांनी ४० वर्षावरील पुरुष गटात ८०० मीटर मधे सुवर्णपदक, १५०० मीटर मधे रौप्यपदक आणि ५ किमोमीटर मध्ये कांस्यपदक प्राप्त केले. तसेच त्यांचे मार्गदर्शक मनीष वामन खवळे यांनी ५५ वर्षांवरील पुरुष गटात उंचउडी मधे रौप्यपदक आणि तिहेरी उडी मधे कांस्यपदक प्राप्त केले.
या सर्वांची निवड भारतीय संघातर्फे श्रीलंका येथे होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगडभूषण राजू बळीराम मुंबईकर यांनी तसेच समाजातील विविध मान्यवरांनी कौतुक तसेच अभिनंदन केले आहे.व्हाट्सअप, फेसबुक ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, मित्र वर्ग, चाहत्यांनी या विजया बद्दल त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत
