रत्नागिरी : मध्य रेल्वेने दादर ते रत्नागिरी मार्गावर होळीसाठी जाहीर केलेल्या विशेष गाडीला पुरेसे थांबे न दिल्यामुळे मंगळवारी पहिल्या दिवशी सुटलेली ही गाडी जवळपास निम्मी रिकामीच धावली.
शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली पूर्वीची दादर ते रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादर येथूनच सोडली जावी यासाठी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना भेटून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याची याची दखल घेऊन मध्य रेल्वेने दादर ते रत्नागिरी या मार्गावर होळीचे निमित्त साधून जाणाऱ्या तीन व येणाऱ्या तीन अशा एकूण सहा विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यानुसार दादर येथून रत्नागिरीसाठी पहिली विशेष गाडी मंगळवारी 11 मार्च रोजी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी सुटली. पहिल्या दिवशीच्या या गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दादरवरून सुटून जेव्हा ही गाडी ठाणे स्थानकावरून पुढील प्रवासासाठी निघाली तेव्हा जवळपास 50 ते 60 टक्के आसने रिकामी होती.
कोकण विकास समितीने महाडचे आमदार व राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्याकडे ०११३१/०११३२ दादर रत्नागिरी दादर होळी विशेष गाडीबाबत पुढील मागण्या मांडल्या होत्या :
१. या गाडीला करंजाडी, सापे वामने, विन्हेरे येथे थांबे मिळावेत
२. सदर गाडी ११ ते ३१ मार्च, २०२५ पर्यंत दैनिक स्वरूपात चालवावी
३. किमान ४ आरक्षित डबे उपलब्ध असावेत
ना. गोगावले यांनी तातडीने याची दखल घेतली. तसे पत्र महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे महामंडळ यांना दिले आहे. मात्र त्याची कार्यवाही रेल्वेकडून अद्यापही न झाल्यामुळे पहिल्या फेरीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
- हे देखील वाचा : Good News | होळीसाठी दादर-रत्नागिरी अनारक्षित विशेष ट्रेन
- Konkan Railway| उधना -मंगळुरू विशेष गाड्या जूनपर्यंत धावणार!
