- कोकण रेल्वेची तांत्रिक टीम तातडीने घटनास्थळी रवाना ; अवघ्या काही वेळात थांबलेली वाहतूक मार्गस्थ
खेड : कोकण रेल्वे मार्गावर खेड ते रोहा दरम्यान दिवाणखवटी रेल्वे स्थानकानजीक ओव्हरहेड विद्युत वाहिनी (ओ एच ई ) तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली.
काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली मांडवकरवाडी येथे कोकण रेल्वेची ओव्हरहेड विद्युत वाहिनी तुटून रेल्वेची वाहतूक साडेतीन तास विस्कळीत झाली होती. दिल्लीहून एर्नाकुलमकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसचा पॅन्टोग्राफ विद्युत वाहिनीला आधार देणाऱ्या तारेत अडकल्यामुळे ही घटना घडली होती.
या घटनेपाठोपाठ मंगळवारी सायंकाळच्या सुमारास खेड तालुक्यातील दिवाणखवटीनजीक ओव्हर हेड विद्युत वाहिनी तुटल्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीत काही काळासाठी व्यत्यय निर्माण झाला. मात्र, कोकण रेल्वेच्या तांत्रिक टीमने तातडीने घटनास्थळी रवाना होऊन तुटलेली तार जोडल्यानंतर रेल्वेचे वाहतूक सुरू झाली.
