संत साहित्याचा गौरव करण्याचा मान लाभला हे आपले भाग्य : ना. डॉ. उदय सामंत

  • १३ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन, शिर्डी – अहिल्यानगर

शिर्डी अहिल्यानगर : संत साहित्याचा गौरव करण्याचा मान मिळाल्याचा अत्यंत अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केले.

शिर्डी, अहिल्यानगर येथे झालेल्या १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहिले असता ते बोलत होते. या संमेलनात बोलताना ना. डॉ. उदय सामंत म्हणाले की, मला या संमेलनात सहभागी होण्याचा आणि संत साहित्याचा गौरव करण्याचा मान मिळाल्याचा अत्यंत अभिमान आहे.
मी भाग्यवान आहे की, आतापर्यंत चार वेळा संत साहित्य संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मराठी भाषेचा मंत्री म्हणून मराठी भाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्याचे भाग्यही मला या निमित्ताने लाभले.

संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार – आमचे दृढ संकल्प

संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधील साडे चार हजार अभंग इ-बुक स्वरूपात जगासमोर आणण्याचा संकल्प महायुती सरकारने केला आहे. संतांच्या शिकवणुकीला आपल्या जीवनात व राज्यकारभारात उतरविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

वारकरी संप्रदायाचा सन्मान

माझी संतवाणी, माझं संत साहित्य, माझी मराठी भाषा जगाच्या पटलावर पोहोचविण्याचे महान कार्य वारकरी संप्रदाय करत आहे. भारतातील विविध प्रांतांतून आलेल्या संत मंडळींना व मान्यवरांना ना. सामंत यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आले.
या संमेलनाला माजी खासदार सदाशिव लोखंडे, संमेलनाध्यक्ष संजय महाराज देवकर, विठ्ठल काकाजी पाटील, निवृत्ती नामदास, महादेव महाराज शिवणीकर, चैतन्य कबीर बुवा, चकोर बाविस्कर, विवेक महाराज गोसावी, श्रीकांत ठाकूर, हरिभाऊ चिकणे, वारकरी साहित्य परिषदेचे पदाधिकारी व देशभरातील वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE