मुंबई-मडगाव स्वतंत्र वंदे भरत एक्सप्रेसची ओळख पुसली जाणार?

  • प्रतिसाद लाभत नसलेल्या मंगळूरु-मडगाव वंदे भारत एक्सप्रेससोबत एकत्रीकरणाच्या हालचाली

रत्नागिरी : उद्घाटनानंतर सुरुवातीपासूनच शंभर ते 105 टक्के इतके प्रवासी भारमान लाभत असलेली मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची स्वतंत्र ओळख पुसण्याचा घाट घातला जात आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार  मंगळूर- मडगाव या प्रतिसाद नसलेल्या वंदे भारत एक्सप्रेससाठी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे एकत्रीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी याला काहीच विरोध करीत नसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील या प्रतिष्ठेच्या गाडीचा बळी जातो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

२२२२९/२२२३० मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला पहिल्या दिवसापासून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद आहे. आता ही गाडी १००-१०५% प्रवासी भारमानासह धावत आहे.  बहुतांश वेळा तिकीट प्रतीक्षा यादीतच असते. यावरून या गाडीची लोकप्रियता दिसून येते. म्हणूनच या गाडीला २० डब्यांचा रेक देण्याची आवश्यकता आहे. तशी मागणी कोंकण विकास समितीतर्फे यापूर्वी वारंवार करण्यात आली आहे. काही माध्यमांनी तथ्यांवर आधारित बातमी न देता केवळ ऐकीव माहितीवर विसंबून बातमी दिल्यामुळे मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला ७०% भारमान असल्याची अफवा पसरली. परंतु त्यात काही तथ्य नसून मुंबई मडगाव गाडी कायम प्रतीक्षा यादीत असते हेच सत्य असल्याचे कोकण विकास समितीने निदर्शनास आणले आहे.

दरम्यान, २०६४५/२०६४६ मंगळुरू मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत नसल्यामुळे रेल्वेने आता मंगळुरु मडगाव व मुंबई मडगाव वंदे भारतच्या एकत्रीकरणाची तयारी चालवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कर्नाटकातील लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे याबाबत अगदी अलीकडेच  रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे यांच्यात एक बैठक पार पडून वेळापत्राकवर गांभीर्याने चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. 

चालत नसलेल्या दुसऱ्या गाडीसाठी बळी कशाला?

मंगळुरू मडगाव वंदे भारतला प्रवासी न मिळाल्याचा फटका पहिल्या दिवसापासून प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या व २० डब्यांची आवश्यकता असलेल्या मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला बसता कामा नये. दोन गाड्यांचे एकत्रीकरण झाल्यास खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी या स्थानाकांसाठी पूल्ड कोटा (pooled quota) व रिमोट लोकेशन कोटा (Remote Locaton Quota) निर्धारित केला जाईल. यात क्षमतेच्या केवळ १५ ते २०% जागा उपलब्ध असतात. उर्वरित जागा दक्षिणेकडील स्थानाकांना जाऊन अत्यल्प कोटा दिल्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना गाडीची तिकिटे मिळू शकणार नाहीत.

मंगळुरु मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद न मिळण्याचे कारण या गाडीला दिलेले अपुरे थांबे कारणीभूत आहेत. कारवार आणि उडुपी दरम्यान १९० किलोमीटर अंतर ही गाडी कुठेच थांबत नाही. त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे कोकण विकास समितीने निदर्शनास आणून दिले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE