रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकात वातानुकुलित विशेष अतिथी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
या प्रसंगी कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, माजी आमदार संजय कदम, कार्ययोजना आणि वाणिज्य संचालक सुनिलकुमार गुप्ता, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, उपसरपंच अशोक विचारे, सचीन वहाळकर, प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट आदी उपस्थित होते.

रत्नागिरी स्थानकावर विमानतळासारखी वातानुकुलित सुविधा अवघ्या प्रती तास ५० रुपयात या विशेष अतिथी कक्षात देण्यात येणार आहे.
–संतोषकुमार झा, कोकण रेल्वे
यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, रत्नागिरीचे रेल्वे स्थानक विमानतळापेक्षा सुंदर बनले आहे. एमआयडीसीने 40 कोटी दिले आहेत. शिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागानेही निधी दिला आहे. प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा होत आहेत. मात्र, सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची आहे. आणखी पाच दहा कोटी निधी लागला तरीही एमआयडीसीमार्फत दिला जाईल. पण, मुंबई विमानतळापेक्षाही रेल्वेस्थानके चांगली व्हायला हवीत. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोकणातील रेल्वे स्थानके चांगली बनविण्यासाठी मेहनत घेतली आहे.
