आरवली (संगमेश्वर): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa National Highway) संगमेश्वर तालुक्यातील आरवली राजवाडी (Aravali Rajwadi) येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका बिबट्याचा (Leopard) दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आरवली राजवाडी मारुती मंदिरासमोर शनिवारी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळाची पाहणी केल्यावर असे दिसून येते की, बिबट्या रात्रीच्या सुमारास महामार्ग ओलांडत असताना त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
आज सकाळी काही ग्रामस्थांना महामार्गावर बिबट्याचा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ याची माहिती वन विभागाला (Forest Department) दिली. महामार्गावर वन्यजीवांचा वावर आणि अशा प्रकारचे अपघात चिंताजनक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही करत आहेत.
