रत्नागिरीमध्ये भूमिगत विद्युत वाहिनी रूपांतरण कामाचे लोकार्पण

भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे नैसर्गिक आपत्ती प्रसंगी

ग्राहकांना सुरळीत वीज सेवा मिळेल – मा. ना. डॉ. नितीन राऊत

रत्नागिरी – चक्रीवादळे, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्ती प्रसंगी भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे वीज ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठा मिळण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन मा. ना. डॉ. नितीन राऊत यांनी केले. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प -2 अंतर्गत रत्नागिरी शहरामध्ये 11 के.व्ही. कर्ला उच्चदाब उपरी विद्युत वाहिनी मार्गाचे भूमिगत विद्युत वाहिनीत रूपांतरण कामाच्या ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

   यावेळी महावितरणचे संचालक (संचलन) श्री. संजय ताकसांडे, ऊर्जामंत्री यांचे खाजगी सचिव श्री. सिध्दार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड, मुख्य अभियंता (कोपर) श्री. विजय भटकर, अप्पर जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी श्री. सुशांत खांडेकर, मुख्याधिकारी श्री. तुषार बाबर, अधीक्षक अभियंता श्री.नितीन पळसुलेदेसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.    पुढे बोलताना श्री. राऊत म्हणाले की, समुद्र किनारपट्टीच्या भागात खाऱ्या हवामानामुळे वीज वाहिन्या गंजतात. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून पडणे अशा घटना घडतात. वीज ग्राहकांच्या सेवेवर परिणाम होतो. आता या भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे या भागातील महावितरणचेही नुकसान टळेल व वीज ग्राहकांना सुरळीत वीज सेवा मिळण्यास मदत होईल. या प्रकल्पाचे काम गतीने करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.श्री. उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभते आहे, असे सांगून श्री. राऊत यांनी श्री. सामंत यांचे आभार मानले. तौक्ते व निसर्ग चक्रीवादळाच्या प्रसंगी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या भागातील विद्युत जाळे अधिकाधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे या भूमिगत प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. अति विशिष्ट कार्यामुळे रत्नागिरीत लोकार्पण सोहळयासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी श्री. राऊत यांनी गतवर्षीच्या आपत्तीप्रसंगी महावितरणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले.   

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE