सावधान..! रत्नागिरीत फिरायला येताय तर वाहतूक कोंडीत अडकण्याच्या तयारीनेच या!

  • रस्त्यांच्या कामातील निष्काळजीपणाचा वाहनधारकांसह नागरिकांना फटका
  • गाडीत शेगडीसह ठेवा जेवणाचे सामान!

रत्नागिरी : मिऱ्या ( रत्नागिरी) नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासह शहरातील मुख्य रस्त्याची अर्धवट कामे, अपूर्ण साईटपट्ट्या यामुळे रत्नागिरीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महामार्ग ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामाचा फटका पर्यटकांनाही सहन करावा लागत आहे. गुरुवारी दुपारी साळवी स्टॉप ते टीआरपी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यामुळे कोणी रत्नागिरीबाहेरून फिरायला येणार असेल तर त्यांनी वाहतूक कोंडीत अडकण्याच्या तयारीनेच यावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून रत्नागिरीतील रस्त्यांच्या कामाबाबत ओरड सुरू आहे. वाहतुकीचे अयोग्य नियोजन तसेच रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा नियोजनशून्य कारभार यामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. साळवी स्टॉप ते जे.के. फाईल कंपनी दरम्यानच्या रस्त्याची तर पूर्णतः वाताहत झाली आहे. मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने वाहनधारकांचा विचार न करता जेके फाईल कंपनीच्या बाजूने खडबडीत रस्ता वाहतुकीसाठी सुरू ठेवला आहे. या ठिकाणी एका लेनवरूनच दोन्ही दिशांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अधून मधून या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. गुरुवारी दुपारी तर राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

सीएनजी कंपनीला एमआयडीसीतील अर्धा रस्ता आंदण?

जेके फाईल्स थांब्यापासून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून सीएनजीच्या तुटवड्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. या मार्गावरील अर्धा रस्ता तर सीएनजी कंपनीला पंपावर गॅस भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांना आंदण दिलेला आहे की काय, असा सवाल निर्माण झाला आहे. गुरुवारी मिऱ्या- नागपूर राष्ट्रीय महामार्गासह जे.के. फाइल्स येथे सीएनजी पंपासमोर लागलेल्या वाहनांनी अर्धा रस्ता आधीच व्यापून टाकला होता. त्यामुळे याही रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.

रत्नागिरी शहरातील रस्त्यांमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती लक्षात घेता तुम्ही जर रत्नागिरी बाहेरून फिरायला येणार असाल तर आपल्या वाहनात शेकडीसह जेवणाचे साहित्यही बरोबर ठेवावे. म्हणजे वाहतूक कोंडीत फसल्यावर तेवढ्या वेळेत चहा जेवणही उरकता येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीत आल्यावर सीएनजी साठी तर पर्यटकांना अर्धा दिवस हा पर्यटकांना गॅस पंपासमोर घालवावा लागत आहे. अशी परिस्थिती असेल तर रत्नागिरीत आल्यावर फिरायचे कधी, असा सवाल पर्यटकांकडून विचारला जात आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE