पोलादपूर : गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत बोगद्यापासून 200 मीटर अंतरावर दरड कोसळली. ही घटना रविवारी (दि.१५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
गेल्या महिन्यात सुद्धा या ठिकाणी दरड कोसळून वाहतुकीला खोळंबा झाला होता. आज पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक एकाच लेनवरून सुरू ठेवण्यात आली. जवळपास दीड तासानंतर दरड हटविण्यासाठी यंत्रणा पाठवून दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
