खेडच्या रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली ; शाळकरी विद्यार्थी ३ तास बसमध्ये अडकले!

  • सार्वजनिक बांधकाम खात्याने दरड हटवल्यावर वाहतूक सुरू

खेड ( रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडला सातारा जिल्ह्याशी जोडणाऱ्या तसेच पर्यटकांची पसंती असलेल्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा दरड कोसळली. या घटनेमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाहून खोपी येथील शाळेत गुरुवारी सकाळी एसटी बसने येणारे विद्यार्थी तीन तास अडकून पडले.

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांचा दुवा समजला जाणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चार दिवसात दुसऱ्यांदा दरड रस्त्यावर आली. दरडीतील भली मोठी शिळा रस्त्यावर येऊन पडल्याने काही तासांसाठी रघुवीर घाट मार्गे होणारी वाहतूक खंडित झाली.

दरड कोसळल्यामुळे गुरुवारी दि.३ रोजी सकाळी अकल्पे येथून खेडकडे येणारी एसटी बस घाटातच अडकून पडली होती. या बसमध्ये खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत जाणारे विद्यार्थीही होते. या विद्यार्थ्यांना तब्बल तीन तास बसमध्ये अडकून राहावं लागलं.

दरम्यान, रघुवीर घाटात दरड कोसळल्याची माहिती युवा सेनेचे खेडमधील कांदाटी विभाग संघटक (शिंदे गट) भूषण मोरे यांनी  तातडीने संबंधित यंत्रणांना दिली. श्री मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विक्की भोसले, संदीप कदम यांनी ही दरड हटवून रस्ता मोकळा करण्यात शासकीय यंत्रणांना सहकार्य केले.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून दरड हटवण्याचे काम सुरू केले. गुरुवारी दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास दरड हटवण्यात आल्यावर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE