मराठी हिंदी वाद निर्माण करण्यासाठीच निशिकांत दुबेंचे वक्तव्य : हर्षवर्धन सपकाळ

  • पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा फतवा रेशिमबागेतून आला, मराठी भाषा गिळंकृत करण्याचा प्रयत्न

मुंबई, ७ जुलै २०२५ : हिंदी, हिंदुत्व व हिंदू राष्ट्र ही ज्यांची संकल्पना आहे तेच लोक पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या पाठीमागे आहेत. या मानसिकतेचे लोकच बहुजनांच्या ज्ञानाची मराठी भाषा व तिचा संघर्ष गिळू पहात आहेत. हा जुनाच संघर्ष असून हिंदीच्या निमित्ताने तो पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे. हिंदी सक्तीच्या फतव्यामागे रेशिमबाग असल्याने त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करत आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने हिंदी सक्ती विरोधात आज आझाद मैदानात धरणे आंदोलन केले, या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, मराठी ही बंडखोर भाषा आहे. ज्ञान फक्त मोजक्याच लोकांना मिळाले पाहिजे व ते इतरांना मिळता कामा नये व तसा कोणी प्रयत्न केल्या तर त्याला शिक्षा केली जात असे. पण त्याला वेळोवेळी आव्हान दिले गेले, त्याविरोधात बंड केले गेले. मराठी ज्ञान भाषा होता कामा नये अशा एक वर्ग होता तोच वर्ग हिंदी सक्तीच्या नावाने जुनीच लढाई लढण्याच्या तयारीत आहे. त्यांनी आज हिंदी सक्तीचा दगड मारून पाहिला आहे. पण लोकांचा तीव्र विरोध पाहून दोन्ही शासन आदेश रद्द केले आहेत, असे असले तरी ही लढाई संपलेली नाही. सरकारने डॉ. नरेंद्र जाधव समिती नेमलेली आहे. जाधव हे रबर स्टॅम्प असून ते भाषा तज्ञ नाहीत. सरकारला जे हवे तेच ते नरेंद्र जाधवांकडून करून घेतील. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही..

आपला लढा दोन जीआर रद्द करण्यापुरता नाही तर महाराष्ट्र धर्म वाचवण्याचा असून आगामी काळात एक कृती आराखडा तयार करून जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन जागृती करावी लागेल. या लढाईत काँग्रेस पक्ष आपल्या सोबत आहे, असा विश्वासही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

खा. निशिकांत दुबेंचे विधान भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करणारे..

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी हिंदी वादावर केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. दुबेंच्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षाला मराठी हिंदी वाद निर्माण करून वाढवायचा आहे हे स्पष्ट दिसत आहे. मराठी हिंदी हा भाषिक वाद निर्माण करून त्याला भारत पाकिस्तान वादासारखा शत्रुत्वाचा रंग देण्याचा हा प्रयत्न देशभरातील भाजप नेत्यांकडून सुरु आहे. भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करण्याचा हाच अजेंडा भाजप निशिकांत दुबेंच्या तोंडून पुढे रेटत आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE