आजच्या काळात सायबर संस्कारांची गरज : डॉ. अक्षय फाटक


रत्नागिरी : सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात. आपण दक्ष राहिलो आणि न घाबरता परिस्थितीला तोंड दिले, तर ते घडणार नाहीत. म्हणूनच आजच्या युगात सायबर संस्कारांची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षय फाटक यांनी केले. रविवारी (तीन ऑगस्ट) सायंकाळी रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायबर संस्कार’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, रत्नागिरी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मयूर बेहेरे उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध वयोगटांतील रत्नागिरीकरांनी हजेरी लावली होती.

मोबाइलद्वारे फसवणुकीचे अनेक गुन्हे घडतात. फसवणुकीचे प्रकार ओळखायचे कसे, त्यात अडकू नये म्हणून काय करायचे आणि अडकायला झाले तर काय करायचे याबद्दलचे मार्गदर्शन डॉक्टर अक्षय फाटक यांनी या कार्यक्रमातून केले. सायबर फसवणुकीची उदाहरणे सांगतानाच, मोबाइलची आवश्यक सेटिंग्ज आणि डिजिटल व्यासपीठावर माहितीची गोपनीयता जपण्याबद्दलही त्यांनी सांगितले. मुलांना मोबाइल द्यायचा झाल्यास काय काळजी घ्यावी, याबद्दल सांगतानाच चांगली व्यक्ती घडण्यासाठी ‘सायबर संस्कार’ हा १७वा संस्कारही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपण दक्ष राहिलो, सारासार विचार करण्याची बुद्धी न हरवता शांतपणे अशा प्रकाराला सामोरे गेलो, तर असे गुन्हे घडणारच नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तरीही काही घडलेच, तर मदतीसाठी आपण कायम उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. उपस्थितांच्या निवडक प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.

सध्या रत्नागिरीत वास्तव्याला असलेले डॉ. अक्षय फाटक हे मूळचे कसबा-संगमेश्वर येथील तरुण इंजिनीअर असून, ज्योतिर्विद्यावाचस्पती आहेत. आपल्या मैत्रिणीला अशाच एका प्रकारातून जीव गमवावा लागल्यानंतर त्यांनी समाजावर सायबर संस्कार करण्याचा वसा घेतला आहे. मोबाइल किंवा समाजमाध्यमांवरची खाती हॅक झाल्यास किंवा सायबर फसवणूक घडल्यास त्यातून तातडीने मार्ग काढण्यासाठी डॉ. अक्षय कोणतेही मानधन न घेता मदत करतात. कोणी मानधन देऊ केल्यास ती रक्कम दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या आशादीप आणि आविष्कार या संस्थांना द्यावी, असे ते सांगतात. यातून आतापर्यंत त्या संस्थांना दीड लाख रुपयांहून अधिक देणगी मिळाली आहे. डॉ. फाटक यांनी आतापर्यंत शाळा-महाविद्यालयांसह अनेक ठिकाणी हा कार्यक्रम छोट्या स्वरूपात केला आहे. रविवारी झालेला कार्यक्रम ८५वा होता आणि तो प्रथमच व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आला होता.

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. एका फोनकॉलच्या माध्यमातून आपलीही १२ लाख रुपयांची फसवणूक होणार होती; मात्र नेमक्या वेळी शंका येऊन उचललेल्या पावलांमुळे ती फसवणूक झाली नाही, याबद्दलचा किस्साही डॉ. सामंत यांनी या वेळी सांगितला. या कार्यक्रमासाठी सावरकर नाट्यगृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल पालिकेचे कौतुक करतानाच पालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE