रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा प्रियकराकडून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. ही तरुणी मिरजोळे येथील रहिवासी आहे. तिचे रत्नागिरी तालुक्यातीलच वाटद खंडाळा येथील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे तसेच त्यातूनच हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी खून झालेल्या तरुणीचा मृतदेह शनिवारी सायंकाळी उशिरा आंबा घाटातून बाहेर काढला आहे.

मिरजोळे येथील भक्ति मयेकर (26) ही युवती मागील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा कुटुंबीयांकडून शोध सुरू होता.
याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चौकशी केल्यानंतर भक्ती हिचा प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (25 ) याने तिच्यासोबत उद्भवलेल्या वादातून तिचा काटा काढल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यावर दुर्वास पाटील याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
दरम्यान या घटनेतील मृत तरुणी भक्ती जितेंद्र मयेकर हिचा मृतदेह आंबा घाटात जिथे फेकून दिला होता त्या दरीतून शनिवारी सायंकाळी बाहेर काढण्यात आला आहे.














