रत्नागिरी, दि. 15 : मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार 13 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जे जामदार यांच्या हस्ते व रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष विनोद जाधव, विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक अदालत पार पडली.
या लोकअदालतमध्ये जिल्ह्याभरातून 4 हजार 813 न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि 15 हजार 345 वाद दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. लोक अदालतमध्ये एकूण 3 हजार 850 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन वाद संपुष्टात आले. सात कोटी सात लाख एकोणऐंशी हजार पाचशे नऊ रुपये एवढ्या रक्कमेची तडजोड झाली. यामध्ये वकीलवर्ग व पक्षकार यांचा उस्फूर्त सहभाग होता.
लोकअदालतमध्ये प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेश संबंधीत खटले, वैवाहिक वाद अशी प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायत पाणीपट्टी व घरपट्टी वसुली, बॅंका, पतसंस्था, थकीत विजबिले, टेलिफोनची थकीत बिले, मोटार वाहन चलन प्रकरणे इत्यादी प्रकरणांमध्ये तडजोड झाली.
लोक अदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी चे सचिव आर. आर. पाटील व कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच तालुका विधी सेवा समिती येथील न्यायाधीश व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
