रत्नागिरी, दि. १ : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व जिल्हा शासकीय रुग्णालय अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्यामार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त शहरात बाईक रॅली काढण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरूवात झाली. रॅली सिव्हील हॉस्पिटल येथून जयस्तंभ मार्गे साळवी स्टॉप व परतून मारूती मंदिर मार्गे सिव्हील हॉस्पिटल येथे समारोप झाला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव कांबळे, रक्तपेढी अधिकारी डॉ. अर्जुन सुतार, एआरटी वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी आठल्ये, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन पाटील उपस्थित होते.
1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त एड्स विषयी जनजागृती व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून एचआयव्ही तपासणीस प्रोत्साहित करणे या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात एचआयव्ही च्या जागरूकतेसंबधी शपथ घेण्यात आली.
अडथळ्यांवर मात करू एकजुटीने, वाटचाल एड्स संपविण्याच्या दिशेने, एचआयव्ही एड्सला लढा देवू, नवं परिवर्तन घडवू हे या कार्यक्रमाचे घोषवाक्य होते.














