- भाजप महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यातच खरी लढत
उरण दि 2 (विठ्ठल ममताबादे ) : उरण नगर पालिकेच्या सत्तेसाठीची निर्णायक लढत शिगेला पोहोचली असताना संपूर्ण शहरात राजकीय तापमान प्रचंड वाढले होते.दि. 2 डिसेंबर 2025 रोजी नागरिकांनी मतदान केले. उरण नगर परिषदेत एकूण 67.92 % मतदान झाले. सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.मतदानानंतर कोणत्या पक्षाचा झेंडा नगरपालिका इमारतीवर फडकणार, याकडे सर्व उरणकरांचे डोळे लागले आहेत. निकाल 3 डिसेंबर 2025 रोजी लागणार होता मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णया मुळे आता निकाल पुढे ढकलण्यात आला आहे.
उरण नगरपालिकेतील एकूण 10 प्रभागांतून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षा अशा एकूण 22 पदांसाठी निवडणूक संपन्न झाली आहे. नगराध्यक्षा पद महिला राखीव असल्याने सर्व पक्षांच्या गणितात मोठी उलथापालथ झाली होती.योग्य महिला उमेदवारांच्या शोधासाठी पक्षांना धावाधाव करावी लागली. या निवडणुकीत 13,311 पुरुष आणि 12,903 महिला असे मिळून 26,214 मतदार होते.
नगराध्यक्षा पद हे जनतेकडून थेट निवडून द्यायचे असल्याने मुख्य लढत अत्यंत चुरशीची बनली होती. महाविकास आघाडीतर्फे भावना घाणेकर या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर मैदानात होत्या , तर भाजपतर्फे शोभा कोळी या कमळ या चिन्हावर उमेदवारी लढवली. शिवसेना शिंदे गटाच्या रुपाली ठाकूर हे धनुष्यबाण या निशाणीवर आणि एक अपक्षही रिंगणात असले तरी खरी लढत भावना घाणेकर व शोभा कोळी यांच्यातच झाली आहे.उरणकरांच्या नजरा या दोन्ही महिला उमेदवारांच्या विजयाकडे खिळल्या आहेत.कोण नगराध्यक्ष बनणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजप महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यातच खरी लढत असल्याचे यावेळी दिसून आले.
नगरसेवकांच्या 21 जागांवर महाविकास आघाडी व भाजप यातच मुख्य सामना झाला आहे. प्रभागनिहाय मतदारसंख्या पाहता प्रभाग 1 ते 9 मधून प्रत्येकी 2 नगरसेवक, तर प्रभाग 10 मधून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत.
प्रभागनिहाय मतदारसंख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक 1 मध्ये पुरुष 1605, महिला 1706 एकूण 3311, प्रभाग 2 मध्ये पुरुष 1549, महिला 1613 एकूण 3162, प्रभाग 3 मध्ये पुरुष 1252, महिला 1168 एकूण 2420, प्रभाग 4 मध्ये पुरुष 1416, महिला 1321 एकूण 2737, प्रभाग 5 मध्ये पुरुष 1298, महिला 1268 एकूण 2566, प्रभाग 6 मध्ये पुरुष 1010, महिला 1049 एकूण 2059, प्रभाग 7 मध्ये पुरुष 1566, महिला 1388 एकूण 2954, प्रभाग 8 मध्ये पुरुष 955, महिला 893 एकूण 1848, प्रभाग 9 मध्ये पुरुष 1148, महिला 1145 एकूण 2293 आणि प्रभाग 10 मध्ये पुरुष 1512, महिला 1352 एकूण 2864 अशी मतदारांची आकडेवारी आहे. या सर्व प्रभागांमध्ये चुरशीची लढत झाली आहे .
मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी मतदान झाले असून बुधवार, दि. 21 डिसेंबर रोजी नगरपालिका कार्यालयात निकाल जाहीर केला जाणार आहे. उरण नगरपालिकेच्या सत्तेचा तख्ता कोणाच्या बाजूने झुकणार, हे स्पष्ट होणार आहे.














