रत्नागिरी : बंगळुरू येथे झालेल्या हिमालया योगा (Himalaya Yoga) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीतील सौम्या मुकादम, प्रतीक पुजारी, श्रिजा सलपे यांनी सुवर्णपदक पटकावले. योगामध्ये रत्नागिरीने आतापर्यंत कमावलेल्या नावलौकिकात या तिघांनी आणखी भर घातली आहे.
एस-व्यासा म्हणजेच स्वामी विवेकानंद योग संस्थान बेंगलोर ही संस्था योगामध्ये भारतात व भारताबाहेरही नावाजलेली संस्था आहे. या संस्थेची ही स्पर्धा बेंगलोर येथे १२ ते १७ डिसेंबर या कालावधीमध्ये झाली. या स्पर्धेत १५ राज्यांनी आपले संघ उतरवले होते.
महाराष्ट्र संघामध्ये रत्नागिरीतील सौम्या देवदत्त मुकादम, समर्थ विनायक कोरगावकर, राधिका मंदार पेडणेकर, प्रतीक पुरंदर पुजारी , श्रेया बलिराम तारे, रत्नेश हितेश आडिवरेकर, सोहम विजय बंडबे आणि श्रिजा सिद्धेश सलपे या ८ जणांचा समावेश होता.
१४ ते १७ वयोगटात खेळत सौम्या देवदत्त मुकादम हिने मुलींमध्ये तर प्रतीक पुरंदर पुजारी याने मुलांमध्ये सुवर्णपदक मिळवले. सौम्या KON शिकत आहे तर प्रतिक पुरंदर पुजारी हा शिर्के शाळेचा विद्यार्थी आहे. श्रिजा सिद्धेश सलपे यांनाही सुवर्णपदक मिळाले असून, त्या महावितरणमध्ये कार्यरत आहेत. या स्पर्धेमध्ये ९ ते १३ या वयोगटात समर्घGGPS कोरगावकर (जीजीपीएस गुरुकुल), श्रेया तारे (एसव्हीएम्), सोहम बंडबे व राधिका पेडणेकर (रा. भा. शिर्के प्रशाला )यांनी रौप्य तर रत्नेश आडिवरेकर (अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज) याने कांस्यपदक मिळविले आहे.
या सर्वांना शिवयोगा क्लासेसचे दुर्वांकुर अविनाश चाळके यांनी प्रशिक्षण दिले आहे. गेले अनेक वर्षे ते जीजीपीएस, शिर्के हायस्कूल येथे कॉम्पिटिटिव्ह योगासाठी मोफत प्रशिक्षण देतात. साईमंदिर हॉल, साळवी स्टॉप येथे ते स्पर्धात्मक योगासाठी शाळेच्या मुलांना मोफत मार्गदर्शन करतात.
चार पद्धतीने मूल्यांकन
या स्पर्धेत खेळाडूंना वेगवेगळ्या चाचणीतून जावे लागते. स्पर्धेचे मूल्यांकन आसने,मुद्रा, क्रिया आणि लेखी परीक्षा या प्रकारांनी केले जाते.
महाराष्ट्राला ट्रॉफी
खेळाडूने मिळविलेले गुण त्या त्या राज्याच्या नावावर जमा होतात आणि ज्या राज्याने जास्त गुण, त्यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफी मिळते. यावर्षी ही ट्रॉफी महाराष्ट्र संघाने मिळवली आहे.














