उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

URAN
महेंद्रशेठ घरत यांनी खासदार बाळ्या मामा यांचेही केले अभिनंदन!
उरण (विठ्ठल ममताबादे )”  : उरण नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भावना घाणेकरांचा विजय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणारा आहे. ज्या वेळी महाविकास आघाडीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत प्राथमिक चर्चा सुरू होती, तेव्हाच मी माजी आमदार मनोहर भोईर यांना सांगितले की, भावना घाणेकर टक्कर देणाऱ्या आणि जिंकणाऱ्या उमेदवार आहेत. त्या राजकारणात सक्रिय आहेत, त्या लढाऊ आहेत. त्यामुळे भावना घाणेकरच उमेदवार हव्यात, या निर्णयावर मी ठाम राहिलो. आज तो निर्णय भावना घाणेकरांच्या विजयाने सार्थ ठरला, याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यामुळे भावना घाणेकर यांचा दणदणीत विजय ‘ए तो झाकी, बहोत कुछ बाकी है’. जे म्हणत होते, भावना घाणेकर यांचे डिपॉझिट जप्त होईल. त्यांना भावना घाणेकरांच्या दणदणीत विजयाने ‘एकही मारा लेकीन सॉलिड मारा’, अशी अवस्था करून ठेवली आहे.
उरणमध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी खूप मेहनत घेतली. खासदार बाळ्या मामा, अमोल कोल्हे, सुषमा अंधारे यांसारख्या नेत्यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे उरणमध्ये महाविकास आघाडीला उत्तम यश मिळाले, या निवडणुकीत मी चाणक्य नीतीचा वापर केला, असे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले. विजयाच्या आनंदाने महेंद्रशेठ घरत यांचा चेहरा फुलला होता.
यावेळी त्यांनी खासदार बाळ्या मामा यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून महाविकास आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “उरणबाबत आपण घेतलेली रोखठोक भूमिका मतदारांना आवडली. आपण मतदानाच्या दिवशी स्वतः येऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलेत, ठामपणे मागे राहिलात याचा निश्चितच फायदा उरण नगरपालिका निवडणुकीत झाला. त्याबद्दल तुमचेही अभिनंदन आणि आभार!”
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE