- २०२५ मध्ये ३.६८ लाख प्रवाशांवर कारवाई; २० कोटींहून अधिक दंड वसूल
रत्नागिरी : कोकण रेल्वेने विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. २०२५ या संपूर्ण वर्षात कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) केलेल्या धडक कारवाईत तब्बल २०.२७ कोटी रुपयांचा महसूल दंड आणि थकीत भाड्याच्या स्वरूपात गोळा केला आहे.
डिसेंबर महिन्यात ९९८ विशेष मोहिमा
केवळ डिसेंबर २०२५ या एका महिन्यात कोकण रेल्वेने ९९८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या मोहिमांमध्ये ४३,८९६ अनधिकृत प्रवासी आढळले. या प्रवाशांकडून २.४५ कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबवण्यात आली होती.
२०२५ वर्षाचा लेखाजोखा: थक्क करणारी आकडेवारी
जानेवारी ते डिसेंबर २०२५ या १२ महिन्यांच्या कालावधीत कोकण रेल्वेने सातत्याने तपासणी सत्र सुरू ठेवले होते.
- एकूण विशेष मोहिमा: ८,४८१
- पकडलेले विनातिकीट प्रवासी: ३,६८,९०१
- एकूण वसूल केलेला दंड: ₹२०.२७ कोटी













