रत्नागिरीत अनधिकृत एल. ई. डी. मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका जप्त

रत्नागिरी : मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत एल.ई.डी. (LED) लाईट लावून मासेमारी करणाऱ्या नौकेवर मोठी कारवाई केली आहे.

दि. ३ एप्रिल २०२६ च्या रात्री सुरू झालेल्या या मोहिमेत ४ एप्रिल रोजी पहाटे २.१७ वाजेच्या सुमारास ही नौका पकडण्यात आली.

मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी तथा जयगडचे परवाना अधिकारी श्रीम. स्मितल कांबळे या आपल्या पथकासह नियमित गस्तीवर होत्या. यावेळी मिऱ्या-काळबादेवी समोर समुद्रात साधारण १०.८३ सागरी मैल (NM) अंतरावर ‘भराडी प्रसन्न’ (नोंदणी क्रमांक: IND-MH-04-MM-3723) ही नौका संशयास्पदरीत्या नांगरून उभी असल्याचे आढळले. या नौकेचे मालक श्री. कैलास उल्हास कुबल (रा. राजवाडी, भगवती बंदर, रत्नागिरी) असून, नौकेकडे राज्याच्या जलधि क्षेत्रासाठी मासेमारी परवाना आहे. मात्र, ही नौका अनधिकृतपणे एल.ई.डी. लाईट लावून मासेमारी करण्याच्या उद्देशाने उभी असल्याचे निष्पन्न झाले.
कठोर कायदेशीर पावले
कारवाईदरम्यान नौकेवर तांडेलसह ५ खलाशी मिळून आले. पथकाने नौकेवरील एल.ई.डी. लाईट आणि जनरेटरसह संपूर्ण नौका जप्त केली असून पुढील कार्यवाहीपर्यंत ती मिरकरवाडा बंदरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

सदर प्रकरणी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) अध्यादेश, २०२१ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
यांनी बजावली भूमिका
सदर मोहीम मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. यामध्ये अंमलबजावणी अधिकारी श्रीम. स्मितल कांबळे यांच्यासह सुरक्षा रक्षक श्री. सुजन पोवार, सागरी सुरक्षा रक्षक श्री. अमोल पिलणकर, श्री. अनिकेत पवार आणि श्री. भूषण करमरकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.

अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी या कारवाईचा सविस्तर अहवाल (प्रतिवेदन) दाखल केला आहे. यानंतर आता या प्रकरणाची रीतसर सुनावणी अभिनिर्णय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या न्यायालयात पार पडणार आहे. बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने उचललेल्या या पावलामुळे अवैध मच्छीमारांचे धाबे दणाणले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE