खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य आयोजन
रत्नागिरी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभाचे खासदार श्री. नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीत भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रत्नसिंधू केसरी २०२६’ या नावाने होणारी ही मानाची स्पर्धा रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी पार पडणार आहे.
कोकणच्या मातीतील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धक कसब पणाला लावणार असून, या सोहळ्याला ‘डबल महाराष्ट्र केसरी’ पै. चंद्रहार पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
खासदार नारायणराव राणे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उद्योग मंत्री आणि केंद्रीय सूक्ष्म लघू मध्यम मंत्री अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी कोकणच्या पायाभूत सुविधांपासून ते आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रापर्यंत क्रांती घडवून आणली. केवळ राजकारणच नव्हे, तर कोकणची कला, संस्कृती आणि क्रीडा परंपरा जपण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून आणि त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तरुणाईला सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यासह रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आ. शेखर निकम, आ. किरण सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह अनेक मान्यवर नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी आणि आमदार श्री निलेश राणे मित्र मंडळ या स्पर्धेचे मुख्य आयोजक असून त्यांना प्रहार डिजिटल आणि लबॅक ट्रान्सपोर्ट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. मांडवी बीचवर रंगणाऱ्या या कुस्तीच्या महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरीतील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.













