रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३२ कोटींचा नफा; राज्यात द्वितीय

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३२ कोटी ९ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवत मोठी झेप घेतली आहे. बँकेने आर्थिक शिस्त आणि अत्याधुनिक ग्राहक सेवांच्या जोरावर महाराष्ट्रातील जिल्हा बँकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची बँक म्हणून स्थान पटकावले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या १८ वर्षांपासून बँक सलग नफ्यात असून ऑडिटमध्ये सातत्याने ‘अ’ वर्ग मिळवत आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.

संकटातून यशाकडे : २००७ मध्ये डॉ. तानाजीराव चोरगे यांनी जेव्हा बँकेची सूत्रे हाती घेतली, तेव्हा बँक मोठ्या आर्थिक संकटात आणि तोट्यात होती. वाढलेला एनपीए (NPA) आणि कर्ज वितरणावरील मर्यादांमुळे बँकेची स्थिती हलाखीची होती. मात्र, गेल्या १९ वर्षांत कोअर बँकिंग प्रणाली, आयटी विभागाची स्थापना आणि कर्ज मंजुरीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण यांसारख्या सुधारणांमुळे बँकेने कायापालट केला आहे. आज बँकेच्या ७५ शाखा असून बहुतांश शाखा ग्रामीण भागात कार्यरत आहेत.

शेतकरी आणि संस्थांना लाभ : सहकार क्षेत्रात इतिहास घडवताना बँकेने आपल्या सदस्य सहकारी संस्थांना ३०% लाभांश दिला आहे, असा निर्णय घेणारी ही देशातील पहिलीच जिल्हा बँक ठरली आहे. जिल्हयातील ९ तालुक्यांमध्ये १९ एटीएम सेंटर्स आणि ३ मोबाईल एटीएम व्हॅनद्वारे ग्राहकांना डिजिटल बँकिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच, नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकरी व उद्योजकांना ५% दराने २५ लाखांपर्यंत कर्जपुरवठा करून बँकेने मोठा आधार दिला आहे.

सामाजिक बांधिलकी आणि विकास : केवळ बँकिंग व्यवसाय न करता, बँकेने सामाजिक उत्तरदायित्वही जपले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना १०० संगणक संच देणे, ३० शाळांना सोलर युनिट बसवणे आणि संस्थांच्या बळकटीकरणासाठी आर्थिक मदत करणे असे उपक्रम राबवले जात आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाचे ‘सहकारनिष्ठ’ व ‘सहकार भूषण’ पुरस्कारांसह आतापर्यंत एकूण २० पुरस्कार बँकेला मिळाले आहेत, ज्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE