मुंबई, दि. 12 : पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा तसेच मुंबईतील वर्सोवा सागरी किनारा स्वच्छता मोहीमेचे नेतृत्व करणारे पर्यावरण कार्यकर्ते अफरोज शहा यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ‘मदर तेरेसा स्मृती पुरस्कार २०२१’ प्रदान करण्यात आले.

पर्यावरण सेवा ही ईशसेवा असून त्यातून माणसाला आत्मिक समाधान लाभते. दिया मिर्झा व अफरोज शहा यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी पर्यावरण संवर्धन कार्यात पुढाकार घेतल्यामुळे अनेक युवक पर्यावरण रक्षण – संवर्धनाच्या कार्याशी जोडले जातील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
पुरस्कार रूपात दिया मिर्झा व अफरोज शहा यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाला हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष अब्राहम मथाई व सुसान अब्राहम प्रामुख्याने उपस्थित होते. सानिया शेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
